श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रीनगरच्या बडगाम इथं जमीन खरेदी केली आहे. काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. श्रीनगर एअरपोर्ट नजीक ही जागा आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने महाराष्ट्र सरकारशी हा व्यवहार केला आहे. मात्र महाराष्ट्र भवनाच्या या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे.
जम्मू कश्मीरमधील महाराष्ट्र भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आरामदायी निवास उपलब्ध करून देवून पर्यटकाला चालना देण्याचा हेतू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरला भेट दिल्यानंतर याठिकाणी जमीन खरेदी आणि पर्यटकांसाठी सुविधा देण्याची प्रक्रिया सुरु झाली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवनावर भाष्य केले. येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात आल्यानंतर हे भवन बंद करू अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. महाराष्ट्र भवनाचा वापर पर्यटकांसाठी केला जाणार आहे. हे ते पर्यटक असतील जे सध्या आमच्या हॉटेल्समध्ये राहतात. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची उपजीविका तुम्ही हिसकावून घेताय. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तुमचं सुरू राहू द्या. आमचे सरकार येताच आम्ही भवनाकडे बघू असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिला आहे.