मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक मागून ४५ दिवसांत अडीच लाख रुपये जमवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, महिलेने तिच्या चार मुलांनाही या कामात लावले होते. पोलिसांना महिलेला अटक केली, तर पती इतर मुलांसह पळून गेला असल्याचे सांगण्यात आले.
इंदूरमधील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी गैर-सरकारी संस्था (एनजीओ) आणि महापालिका काम करत आहेत. कारवाईदरम्यान महिलेला तिच्या 7 वर्षांच्या मुलीसह पकडण्यात आले. महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे, तर तिच्या मुलीला एका एनजीओकडे सोपवण्यात आले आहे. तिच्या मुलीशिवाय, महिलेला 10, 8, 3 आणि 2 वर्षांची आणखी चार मुले आहेत. ती तिच्या मोठ्या मुलांना इंदूरच्या व्यस्त लव-कुश चौकात भीक मागायला लावते.
रिपोर्टनुसार, महिलेकडे एक जमीन आणि दोन मजली घर आहे. 20,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल आणि एक स्मार्टफोन आहे. या महिलेची 6 आठवड्यात सुमारे 2.5 लाख रुपये कमाई होते. इंदूरमधील 38 प्रमुख चौकांवर सुमारे 7,000 भिकारी आहेत, ज्यापैकी 50 टक्के मुले आहेत. स्वयंसेवी संस्था (NGO) च्या रुपाली जैन यांनी सांगितले की, हे भिकारी एकत्रितपणे वार्षिक 20 कोटींहून अधिक कमावतात.