महाआघाडी व्हेंटिलेटरवर…!

इतस्ततः

– मोरेश्वर बडगे

शरद पवार वारंवार पलटी मारत आहेत. अजितदादा पवार भाजपसोबत चालले, अशी जोरदार हवा उठली आहे. संभाजीनगरच्या महासभेला दांडी मारणारे नाना पटोले परस्पर मीडियाशी बोलत आहेत. तीन दिशेला तीन तोंडं… महाआघाडीतला हा तमाशा आहे. हीच मंडळी अडीच वर्षांपूर्वी महाआघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान भाजपला देत होती. आम्ही पाडणार नाही. अंतर्विरोधातून तुमचे सरकार पडेल, असे देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगत होते. मात्र, ते समजून घ्यायच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. शेवटी स्फोट झाला. उद्धव ठाकरे यांच्याच ४० आमदारांनी बंड केले. घरातच लागलेल्या या आगीत महाआघाडीचे सरकार ९ महिन्यांपूर्वी गेले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. उद्धव यांच्या हातून पक्ष गेला, निवडणूक चिन्ह गेले. हिंदुत्वावर बोलायचा हक्कही गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांच्या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. राष्ट्रवादी आता ख-या अर्थाने ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ झाली आहे. उद्धवच नव्हे तर शरद पवारही रस्त्यावर आले आहेत.

उद्धव ठाकरे यांची सध्याची चिंता वेगळी आहे. शिल्लक शिवसेना त्यांना वाचवायची आहे. ‘वज्रमूठ’ नावाने ते महाआघाडीच्या सभा करवत आहेत; पण आता मूठ आहे कुठे? विसंवाद, बेबनाव आणि त्यातून आलेल्या अस्वस्थतेच्या गर्तेत महाआघाडी केव्हाच ‘व्हेंटिलेटर’वर गेली आहे. येत्या निवडणुकांमध्ये तोंडाला बांधलेल्या नळ्या काढल्या जातील… खेळ खल्लास! राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाआघाडीतील मित्रपक्षांसाठी महाआघाडी हा विषय केव्हाच संपला आहे. महाआघाडी नावाच्या पोपटाने केव्हाच मान टाकली, पण तो मेला असे कोणीच बोलायला तयार नाही. तोंडात एकजुटीची भाषा आहे. मात्र, आतून सारे २०२४ च्या निवडणूक तयारीला लागले आहेत. हे सारे एका उद्धव ठाकरे यांच्यामुळे घडले. त्यांच्या मुख्यमंत्री व्हायच्या लोभाने घडले. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होते. मात्र, मुख्यमंत्री व्हायच्या उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेने घात केला. त्यांनी भाजपची संगत सोडली नसती तर आज आपण पाहतो तशी महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा झाली नसती.दररोज शिमगा सुरू आहे. भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी महाआघाडी नावाची सर्कस जन्माला घातली. वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र आले. सत्ता हाच त्यांचा किमान समान कार्यक्रम होता. मात्र, तिन्ही मित्रपक्ष वेगवेगळी भाषा बोलू लागले.

महाआघाडीची केव्हा महाबिघाडी झाली ते कोणालाच कळले नाही. गाजराची पुंगी होती ती. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खायची. अडीच वर्षांतच मोडून खाल्ली. उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तर महाआघाडीच्या पार चिंधड्या उडतील. याची सुरुवात खुद्द काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटले आणि पहिला फटाका लागला. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव यांनी मालेगावच्या सभेत ठणकावून सांगितले तेव्हा धावपळ झाली. २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकजूट करायला निघालेल्या पवारांनी राहुलबाबाला समजावल्याची बातमी आली. सावरकरांचा मामला थंड होत नाही तोच अदानी यांचा मामला पुढे आला. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? हा प्रश्न घेऊन राहुल गांधी हंगामा करीत आहेत. पंतप्रधान मोदींना टार्गेट करू पाहत आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा विषय लावून धरला होता. ‘चौकीदार चोर है’ म्हणत त्यांनी रान पेटवले होते; पण काय झाले? लोकांनी मोदींना ३०३ जागा जिंकून दिल्या. मोदींना बदनाम करून आपण निवडणूक जिंकू, अशा भ्रमात राहुल आणि त्यांची काँग्रेस आजही आहे. सारे चोर मोदी आडनावाचे कसे? असा बालिश सवाल त्यांनी गेल्या निवडणुकीच्या प्रचारात केला होता.

मोदी आडनावाच्या एक व्यक्तीने त्यावरून मानहानीचा दावा टाकला. त्याचा नुकताच निकाल लागला. सूरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा ठोठावली. त्यात त्यांची खासदारकी गेली. त्यामुळे तर राहुलबाबा चेकाळले आहेत. विरोधकांकडे ठोस मुद्देच नाहीत. त्यामुळे त्यांची फजिती सुरू आहे. हिंडनबर्ग नावाच्या एका विदेशी कंपनीच्या अहवालाची ढाल करून मोदींना लक्ष्य केले जात आहे. या मामल्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली. सुप्रीम कोर्टाची समिती उपयुक्त आहे, असे पवारांनी म्हटल्याने खळबळ उडाली. पवारांनी आता आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे पलटी मारली तो भाग वेगळा! मोदींच्या पदवीचा विषय आम आदमी पक्षाने पेटवला आहे. मात्र, कोणाची पदवी किंवा डिग्री हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही, असे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या पदोपदी बदलणा-या भूमिकेने खुद्द त्यांच्याच पक्षात संभ्रम आहे. तसेही पवारांना आता कोणी गंभीरपणे घेत नाही. ८२ वर्षे वयाचा एक ज्येष्ठ नेता म्हणून विरोधी पक्ष त्यांना सांभाळून घेतात. आपले महत्त्व टिकविण्यासाठी दोघांच्या कोलांटउड्या चालू असतात. उद्धव यांचे टोमणे सुरू असतात. उद्धव यांच्याप्रमाणेच पवारांचेही उपद्रवमूल्य घटले आहे.

परवा उद्धव ठाकरे पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. दोघांनीही एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या असतील. राजीनामा देण्यापूर्वी आमच्याशी बोलायला हवे होते, असे पवार म्हणाले. पण उद्धव यांनी कधी कोणाला विश्वासात घेतले आहे की आता घेतील? ‘मतभिन्नता असली तरी सगळ्यांनी एका विचाराने काम करावे. वादग्रस्त विषय टाळावे’ असे दोघांनी ठरवले खरे; मात्र प्रचंड संशयकल्लोळ आहे. उद्धव हेही आता पवारांकडे संशयाने पाहू लागले आहेत. महाआघाडीची गंमत पहा. आपसात एकमत नाही आणि महासभा करतात. सत्ता मागायला निघालात. लोक मूर्ख नाहीत. वैचारिक गोंधळ असणा-या महाआघाडीला कसे मत देतील? अजितदादा वेळीच सावध झालेले दिसतात. काका-पुतण्यामध्ये फाटले आहे. अजितदादांची भाजपशी जवळीक वाढली आहे. केव्हाही दादा भूकंप घडवू शकतात. अंतर्विरोध प्रचंड वाढला आहे. त्यामुळे महाआघाडी चालवण्यात आता दोन्ही काँग्रेसला रस नाही. दुकान उघडं आहे म्हणून तिघे दुकानात बसलेले दिसतात तो भाग वेगळा. महाआघाडीशी काही घेणेदेणे नाही अशा मानसिकतेत दोन्ही काँग्रेस आल्या आहेत.

कोणीही कोणाशी संवाद ठेवत नाही. उद्धव तर अजिबात बोलत नाहीत. पाणी डोक्यावरून गेले तेव्हा उद्धव पवारांकडे गेले. नाना पटोले हे तर आघाडीतील नेत्यांशी चर्चा न करता थेट मीडियाशी बोलत असतात. खुद्द अजितदादांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. संभाजीनगर सभेला पटोले यांनी चक्क दांडी मारली. कोण कोणाला बोलणार? ‘आव जाव घर तुम्हारा है।’ निवडणुका नसताना एवढा अंतर्विरोध, विसंवाद आहे. निवडणुका घोषित झाल्यावर तर मारामा-याच होतील. लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष उरले आहे. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहेत. जागावाटपावरून महाभारत ठरले आहे. जागा वाटल्या तरी पाडापाडीचे उद्योग होतील. यात सर्वाधिक नुकसान उद्धव यांच्या शिवसेनेचे होणार आहे. कारण ‘नसलेली’ महाआघाडी आता त्यांनाच चालवावी लागणार आहे. आतापर्यंत भाजपची मदत व्हायची, मोदींचे फोटो असायचे. आता तर हिंदुत्वाचा मुद्दाही सोबत करणार नाही. उरला सुरला गेम करायला ४० बंडखोर आहेतच.