तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत विरोधी पक्ष नेत्यांवर हल्लाबोल केला . विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी, या विषयासंदर्भातली स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. त्यावर उत्तर देतानाआपल्या अडीच वर्षांच्या काळात एक रुपयाची मदत न करणारे आता शेतकर्यांचा कळवळा आणण्याचा आव आणत आहेत. यांना शेतकर्यांच्या सुखदु:खाशी काही एक देणंघेणं नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ढाळत असलेले मगरीचे अश्रू आहे, अशा शब्दात (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर विधानसभेत जोरदार हल्ला चढवला.
सदर सूचनेचा विषय स्थगितीच्या निकषात बसत नसल्याने विधानसभाध्यक्षांनी सूचना नाकारली. मात्र, विरोधी पक्षाला या विषयावर बोलण्याची संधी दिली. त्यावेळी अजित पवार, नाना पटोले आणि छगन भुजबळ यांनी सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडत असून मदत करीत नसल्याचा आरोप केला.
त्यावर उत्तर देताना, (Devendra Fadnavis) विरोधकांना शेतकर्यांच्या, प्रश्नांशी काही देणंघेणं नाही, निव्वळ राजकारण करायचे आहे. यांच्या काळातले अनुदानाचे पैसे आम्ही आता दिले. कोकणावर मोठं संकट यांच्या काळात आलं. त्याची मदत आम्ही आता दिली. सात हजार कोटी रुपये मदत शेतकर्यांना आतापर्यंत सहा-आठ महिन्यांत आम्ही आमचं सरकार आल्यावर दिली आहे. काल अवकाळी झाली; आज तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. काल नुकसान झालं आणि आज मदत जाहीर करता येत नाही, याची कल्पना विरोधी पक्षाला आहे. तरीदेखील ते राजकारण करीत आहेत. शेतकर्यांची दिशाभूल करण्यासाठी हा सर्व प्रकार चालला आहे.
आम्ही प्रक्रिया जलदगतीने करून या शेतकर्यांनाही तातडीने मदत करणार आहोत. राज्याचं सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि अवकाळीग्रस्त शेतकर्यांना हे सरकार मदत करेल. यांनी कितीही राजकारण केलं आणि मगरीचे अश्रू ढाळले तरी, शेतकर्यांनाही माहिती आहे की, मागील काळात कोणी मदत केली आहे आणि आताही कोण मदत करत आहे, अशा शब्दात (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. दरम्यान, विरोधी पक्षाने स्थगन नाकारल्याचा निषेध करीत सभात्याग केला.
शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची अजित पवार यांची मागणी
गेल्या दोन दिवसांत नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशीम, सोलापूर व राज्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Devendra Fadnavis) कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे नुकसान झाले आहे. कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपिकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रबी पालेभाज्यांचेही नुकसान झालेले आहे. वीज पडून जनावरे दगावली आहेत, शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजूसारख्या पिकांचा मोहोर व संत्रा, लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.