ऑन स्क्रीन : शहर लखोट : गुन्हेगारीनं वेढलेल्या शहराची कहाणी

माणसाच्या हातून कळतनकळत एखादा गुन्हा घडला, तर आयुष्यभर त्याला समाजात गुन्हेगार म्हणूनच ओळखलं जातं. घरातले लोकही त्याला घराण्याला लागलेला कलंक समजतात. कितीही प्रयत्न केले तरी हा कलंक पुसणं मुश्कील होतं.

अशा परिस्थितीत गुन्हेगारीच्या दलदलीत पाय धसत जातो आणि त्यातून बाहेर पडणं अशक्यप्राय होऊन बसतं. गुन्ह्यात अडकलेल्या आणि त्यात अधिकाधिक रुतत जाणाऱ्या व्यक्तिरेखांची अशीच एक कथा ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘शहर लखोट’ या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.

देव तोमर (प्रियांशू पैन्यूली) गुरुग्राममध्ये एका मध्यस्थाचं काम करतोय. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही बाजूंच्या पक्षांना मान्य होईल असा सौदा पक्का करणं हे त्याचं काम आहे. दहा वर्षांपूर्वी एका गुन्ह्यासाठी जेलमध्ये जावं लागलेल्या देवला हे काम करण्यावाचून आता पर्याय नाही.

देवचा बॉस एका कामासाठी त्याला लखोट या शहरात जाण्यासाठी फर्मावतो. देवचं मूळ गाव असलेल्या लखोटमध्ये जाण्याची त्याची तयारी नसली, तरी त्याला नाईलाजानं जावंच लागतं. एका मोठ्या मार्बल कंपनीच्या जागेवर आदिवासी लोकांनी आंदोलन छेडलेलं असतं. देवला हे आंदोलन चिरडण्यासाठी पाठवलं जातं. विकास (चंदन रॉय) या आंदोलनाचा म्होरक्या असतो. त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा देवचा प्रयत्न अयशस्वी होतो.

जमिनीचा मालक कैरव (चंदन रॉय संन्याल) विकासला उज्ज्वल राजकीय करकिर्दीचं आमिष दाखवतो; पण विकास त्याला बधत नाही. ऑफिसमध्ये भेटायला आलेल्या देवला त्याचा भाऊ जय (हर्ष कश्यप) हाकलून लावतो. यामुळे दोन भावांत झटापट होते आणि पोलिस निरीक्षक राजबीर रंगोट (मनू ऋषि चढ्ढा) देवला अटक करण्याची धमकी देतो.

दुसरीकडे एका रशियन मुलीच्या मृत्यूची चौकशी करणारी इन्स्पेक्टर पल्लवी राज (कुब्रा सैत) तपासादरम्यान कैरवच्या पॅलेस हॉटेलमध्ये या घटनेचे धागेदोरे असल्याच्या निष्कर्षाप्रत येते. देवची पूर्वाश्रमीची प्रेयसी संध्या (श्रुती मेनन) कैरवबरोबर राहत असल्याचे देवला समजतं.

काम संपवून लवकर निघण्याचा गुरुग्राममधील बॉसचा देववरचा दबाव वाढत असतानाच एक खून होतो आणि त्या प्रकरणात राजबीर देवला अटक करतो. हा खून नक्की कोणी केलेला असतो, रशियन मुलीच्या मृत्यूमागे काय गूढ असतं आणि देव यातून सहीसलामत सुटतो का या प्रश्नांची उत्तरं सिरीजच्या आठ भागांत दिली जातात.

सिरीजचं लेखन देविका भगत यांचं असून नवदीपसिंग यांचा लेखन आणि दिग्दर्शनात सहभाग आहे. सिरीजच्या लेखनात अनेक त्रुटी आहेत. बऱ्याच घटना कर्मधर्मसंयोगानं घडताना दिसतात. व्यक्तिरेखांच्या मानसिकतेवर अधिक खोलात काम करण्याची आवश्यकता होती असं वाटतं. कारण बऱ्याच घटनांत त्या त्या व्यक्तिरेखेचं वागणं तर्कसंगत वाटत नाही.

व्यक्तिरेखांचा कथाप्रवासही विस्कळित वाटतो. उदाहरणार्थ, विकासची व्यक्तिरेखा कथेत महत्त्वाची असूनही त्याचा योग्य परिणाम साधला जात नाही. याशिवाय त्याचं निष्काळजीपणे वागणंही पटत नाही. बरेचदा नक्की व्यक्तिरेखेला काय करायचं आहे याचा संभ्रम निर्माण होतो. अभिनयात फारसं कोणी प्रभावित करू शकलेलं नाही. प्रियांशूनं प्रामाणिकपणे अभिनयाचा प्रयत्न केला आहे; परंतु त्याची व्यक्तिरेखा फार उथळ वाटते.

कुब्रा सैत पल्लवीच्या भूमिकेत अगदीच विसंगत वाटते. कैरवच्या भूमिकेतील चंदन रॉय संन्याल बऱ्यापैकी लक्षात राहतो. सिरिजचं संकलन अधिक दक्षपणे करण्याची आवश्यकता होती- कारण पाऊण तासांचे आठ भाग पाहण्यात प्रेक्षकांची चांगलीच दमछाक होते.

‘मनोरमा सिक्स फिट अंडर’ आणि ‘एनएच १०’ सारख्या चित्रपटांतून ‘गुन्हा आणि गुन्हेगारी’ या विषयाची समर्थपणे मांडणी करणाऱ्या नवदीपसिंग यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती; परंतु ओटीटीवरील त्यांच्या या पहिल्या वेब सिरीजमध्ये त्यांचं दिग्दर्शनातील कसब फारसं दिसून आलं नाही. त्यामुळे साडेसात तासांची ही सिरीज पाहणं प्रेक्षकांसाठी आव्हानात्मक असणार आहे.