दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोपाच्या फैरी लागल्या झडू

 

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या असून संघात विरोधकांनी काहीही केले तरी विजय आमचाच असा दावा एकनाथराव खडसे यांनी तर खडसेंना कुटुंबा पलिकडे काहीही दिसले नाही असा आरोप आ. मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
दूध संघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून गुरूवारी या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

मी त्यांच्या विरूद्ध लढण्यास तयार : आ. मंगेश चव्हाण यांचे आव्हान

जळगाव : दूध संघाच्या निवडणुकीतून खडसे यांनी माघार घेऊ नये मी त्यांच्या विरूद्ध लढण्यास तयार आहे असे आव्हान देऊन खडसे यांनी कुटुंबाच्या पलिकडे काहीही पाहीले नाही अशी टीका आ. मंगेश चव्हाण यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गुरूवारी या निवडणुकीसाठी माघारीचा शेवटचा दिवस होता. या संदर्भात उमेदवारी दाखल करण्याच्या विषयावर आ.चव्हाण बोलते होते.

सरंजामशाहीने कामकाज

खडसे यांनी दूध संघात सरंजामशाहीने कामकाज पाहीले. अनेकांना त्रास दिला. त्यांनी आतापर्यंत स्वत:च्या कुटुंबा पलीकडे काहीही पाहीले नाही. यासोबतच त्यांनी स्वत:च्या तालुक्यातूनही संस्था वाढू दिल्या नाहीत. यामुळेच भाजपला ते सोबत नको आहेत. त्यांची इच्छा असेल तर मी स्वत: त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहे. त्यांनी अर्ज मागे घेऊ नये असे आव्हान मंगेश चव्हाण यांनी दिले. भाजपच्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये खडसेंना जागा नसेल, हसेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी हितासाठी काम होईल

आगामी काळात दूध संघात शेतकरी दूध उत्पादकांच्या हिताचे काम होईल. संघाची चांगली प्रगती, पारदर्शक कारभार असेल. यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामागे मोठे अर्थकारण आहे या आरोपाचे खंडण करताना आ. चव्हाण म्हणाले, मंगेश चव्हाणला दूध संघातील चहाचीही गरज नाही. दूध संघातून बटर, पावडर चोरीस गेल्याचे ते म्हणतात. यात तथ्य नाही. आपण तक्रार दिली आहे. शेतकर्‍यांनी विश्वासाने तुमच्या हातात संस्था दिली. एवढा बंदोबस्त असताना चोरी कशी होते असेही ते म्हणाले. संघातील दूधा-तुपावर कुणाचे लक्ष होते हे या जिल्ह्यातील जनतेला समजले आहे. माझ वैयक्तीक मत आहे की दूध संघ राजकीय अड्डा न करता कामा नये, संघाची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची नाही आमचे नेते गिरीश महाजन यांनी तर अद्याप लक्षही घातले नाही. त्यांचे कार्यकर्तेच पुरे आहेत. त्यांना या निवडणुकीत स्वारस्य नाही. ही निवडणूक आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल अशी टीकाही त्यांनी केली.
सर्वपक्षीय पॅनलबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, खडसेंविरोधात मीच पोलिसात तक्रार दिली आहे. आरोप केले आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार कशी असा सवाल करून खडसे आमच्या पॅनलमध्ये नसतील असे त्यांनी स्पष्ट केले.

काहीही करा निवडणुकीत विजय आमचाच : एकनाथराव खडसे

जळगाव  दूध संघाच्या निवडणूकीत त्यांना काहीही करू द्या विजय आमचाच होईल असा विश्वास माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे बोलत होते. ते पुढे म्हणाले. इतिहासात प्रथमच दूध संघाच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच मोठी चुरस दिसते आहे. याचा अर्थ दूध संघ आता चांगल्या स्थितीत आहे. पूर्वी तो तोट्यात होता. आता ती स्थिती नाही, हे आजच्या स्पर्धेवरून लक्षात येते. 16 कोटींचे भाग भांडवल दूध संघाचे झाले ते पूर्वी 4 कोटी होते. हा संघ आम्ही नफ्यात आणला. शासनाच्या माध्यमातून 100 कोटींचा प्रकल्प येथे उभा केला. संघ चांगल्या स्थितीत आणल्यानंतर आता अनेकांच्या नजरा इकडे लागल्या आहेत. अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज भरला यात मंत्र्यांनाही लोभ आवराता आला नाही.

मंत्रीपदापेक्षाही दूध संघ महत्वाचा वाटतो. दोन मंत्री, काही आमदार व काही माजी आमदारांनी यात अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही दूध संघात उमेदवार दिले आहेत. 50 वर्षांपासूनच्या परंपरेनुसार तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्यातीलच उमेदवार दिला जात असे. मात्र आता नियम बदलला गेला. बाहेरील उमेदवारही तेथे उमेदवारी देऊ शकेल असा नियम केला. तालुक्यात उमेदवार मिळाला नाही तर तेथे दुसरा उमेदवार देणे हे चुकीचे व नियमबाह्य आहे. राजकीय दबावाखाली या निवडणूका पार पाडण्याचा प्रयत्न आहे. दूध संघ लिलावात काढण्याची वेळ होती तो मी सरकारच्या माध्यमातून उर्जितावस्थेत आणला. संघातील मतदार हा नेहमी आमच्या पाठीशी राहीला आहे. यांनी कितीही काहीही केले तर दूध संघात आम्हालाच यश मिळेल असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व अन्य उपस्थित होते.