मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीनं विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून हातात फलक घेत सरकारविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनात केवळ काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदारचं उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला नाही.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार कोणती भूमीका घेणार ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराचा यात समावेश नव्हता.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या सरकार विरोधी घोषणाबाजीवेळी राष्ट्रवादीचे आमदार का उपस्थित नव्हते, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार सचिन अहिर म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून काल आमची बैठक झाली. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनेक नेते आले होते. आज पहिलाच दिवस असल्याने अजून काही लोक आलेले नाहीत. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमीका आहे ते महत्वाच आहे. मतदारांना काय ते उत्तर द्याव लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ आमदार बसले विरोधी बाकावर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे आठ आमदार आज उपस्थित होते. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे हे आमदार आज उपस्थित होते. शरद पवार गटाचे हे आमदार विरोधी बाकावर बसले होते.