उत्तर प्रदेश : भाजपच्या दोन नेत्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर आहे. शामली आणि अमरोहा येथील हे दोन्ही नेते असून त्यांना तिकीट न मिळाल्याने ते प्रचंड दुःखात होते त्यातून त्यांनी सदर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
शामलीच्या कांधला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांधला नगरपालिकेच्या सभासदपदासाठी दीपक सैनी यांना भाजपचं तिकीट हवं होतं. पार्टीने त्याला तिकीट नाकारलं. त्यामुळे त्याने विष घेतलं. तब्येत बिघडल्यानंतर त्याला तात्काळ मेरठच्या रुग्णालयात दाख करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तो भाजपचा स्थानिक नेता आहे. दीपकच्या मृत्यूमुळे या परिसरावर शोककळा पसरली आहे. त्याला तिकीट मिळालं नाही, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
तर दुसरी घटना अमरोहामध्ये घडली आहे. भाजप नेते मुकेश सक्सेना यांना मोहल्ला मंडी चौब वॉर्ड नंबर 27 मधून लढायचं होतं. त्यांनी वरिष्ठ नेत्यांना तिकीट मागितलं होतं. उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव होतं असा दावा केला जात आहे.
मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला. मुकेश सक्सेना यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे मुकेश प्रचंड दुखावले गेले होते. या दुःखामध्येच त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.