धुळे : शहरातील देवपूर भागातील विटाभट्टी येथे तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपीस सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
देवपुरातील विटाभट्टी येथे हुकूम रमेश चव्हाण (रा. विटाभट्टी) याने आरोपी सतीश भास्कर चौधरी (रा. विटाभट्टी, देवपूर) यास तंबाखू न दिल्याच्या कारणावरून त्याने हुकूम चव्हाण याच्या भावास धक्काबुक्की करून पायात पाय अडकवून खाली पाडले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
दि.८ जुलै २०२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. याबाबत हुकूम चव्हाण याच्या फिर्यादीवरून सतीश चौधरीविरोधात देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी आरोपी सतीश चौधरी यास भादंवि कलम ३०४ (२) अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड, तसेच कलम ५०४ अन्वये ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
रेल्वेखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू
धुळे : पशहरातील चितोड रोड परिसरात राहणारे ४७ वर्षीय सुरेश राजाराम हेमाडे हे दि.२० रोजी रात्री दहाच्या सुमारास यशंवत कृषी विद्यालयाच्या मागील रेल्वे रुळावर जखमीस्थेत आढळून आले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असत डॉ. भैरव वडजे यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. चाळीसगाव रोड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.