---Advertisement---
पाचोरा : पाचोरा बस स्थानकात आज शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात आकाश मोरे (वय २५) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मोरे याच्यावर अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून, काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सध्या पोलिसांनी परिसर सील केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपास सुरू असून, आकाश मोरे याचा पूर्वीचा कुठला वाद होता का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी शांतता राखावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तपास जलदगतीने सुरू आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
स्कूल बसची ठोस लागून एकाचा मृत्यू
पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूल बसची ठोस लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपळगाव हरेश्वर ते पाचोरा रस्त्यावर जामधड नाल्याच्या फरशीवर वळण असलेल्या रस्त्यावर पाचोरा येथील निर्मल स्कूलचे विद्यार्थी गावात सोडण्यास आले होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील बसची किशोर रघुनाथ पवार (४५) या दुचाकीस्वारास ठोस लागली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पाचोरा येथे उपचारास घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती.