---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात शेतीच्या वहिवाटाच्या रस्त्यावरून नेहमीच वाद उफाळून येत असतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी काही भागांत शेत रस्ते केले आहेत. तर काही भागांत शेत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, जेथे गाढ रस्ते आहेत तेथे वारंवार ये -जा करण्यावरून वाद होत असतो. आपल्या शेतातून शेतकरी जाऊ देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद होणे नित्याचे झाले आहे. या वादात शाब्दिक चकमक उडतांना दिसून येते. तर काही वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचतात.
भुसावळ तालुक्यातील खंडाळा गावात देखील अशीच एक घटना पुढे आली आहे. शेतातील गाढ रस्तावरुन ये-जा केल्याच्या कारणावरुन एकास मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध रविवारी ( ७ सप्टेंबर) रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दिगंबर पाटील यांनी शेतातील गाढ रस्त्यावरुन ये-जा केली. या कारणावरुन भुषण प्रकाश पाटील व विशाल प्रकाश पाटील या दोघांनी प्रकाश पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश पाटील यांच्या दात तुटला तसेच ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या फिर्यदीवरुन भुषण पाटील आणि विशाल पाटील याच्या विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर विसपूते करीत आहे.