जम्मू-काश्मीरबाबत केंद्राची मोठी बैठक, कुपवाडामध्ये एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, लष्कराने आज केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलिस आणि सुरक्षा दलांना केरन भागात घुसखोरीची माहिती मिळाली होती, त्यानंतर ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत सीसीएसची बैठक झाली, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाली.

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा व्यवहार समितीची (CCS) महत्त्वाची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सुरक्षा समितीची ही बैठक बराच काळ चालली आणि या बैठकीत जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार ठोस रणनीती आखत असून, त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल, असे मानले जात आहे.

जम्मूमध्येही चकमक सुरू 
दुसरीकडे, जम्मूच्या डोडामध्येही चकमक सुरू आहे. आज सकाळी दहशतवाद्यांनी शोध पथकावर हल्ला केला, लष्कराने गोळीबार केल्यावर दहशतवादी जंगलाच्या दिशेने धावले, तिथे लष्कराने त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. रामबन रेंजचे डीआयजी श्रीधर पाटील यांनी डोडा एन्काऊंटरवर सांगितले की, जंगलात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. कालही दहशतवाद्यांशी चकमक झाली होती आणि आजही चकमक आहे. लवकरच यश मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

त्याचवेळी, जम्मूमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत एक मोठी माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या चिनाब भागात म्हणजेच डोडा-किश्तवाड रेंजमध्ये 10 दहशतवादी सक्रिय आहेत. असे मानले जाते की यातील बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी आहेत, ज्यांच्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर शोध मोहीम राबवत आहेत.

जम्मूमध्ये आयएसआयचा कट उघड
जम्मूमध्येही आयएसआयच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. आयएसआयच्या सूचनेनुसार पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे तीन लॉन्चिंग पॅड उघडण्यात आले आहेत. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून 6 ठिकाणांवरून घुसखोरी होत आहे. यामध्ये बाग, कोटली, नळी, संहनी, तारकुंडी, नाकयाळ आदी भागांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत सुंदरबनीतून घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत.