कांद्याचे वाढते दर, आता केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना

नवी दिल्ली : टोमॅटोच्या किंमतीत घट झाल्यानंतर आता कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर आता केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून वाढत्या दराला रोखण्यासाठी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, कांद्यावर प्रथमच निर्यात शुल्क लावण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता टोमॅटो आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांत कांद्याच्या निर्यातीत वाढ झालेली असताना येत्या सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी कांद्याची निर्यात कमी करण्यासाठी किमान शुल्काचा वापर केला असल्याचे एका सरकारी अधिकारी यांनी सांगितले.