ऑनलाईन फसवणुकीची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारची नवी यंत्रणा; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑनलाईन फ्रॉड किंवा गुन्हे करण्यासाठी सायबर भामटे नवनवीन मार्ग शोधून काढत आहेत. या महाठगांना रोखण्यासाठी मोदी सरकारने आता ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. सेक्टॉर्शन, नोकरीचं आमिष, ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) अशी यांची नावं आहेत.

टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. दररोज फसवणुकीची शक्यता असणारे 2,500 कनेक्शन्स कट करण्यात येत आहेत. तसंच, फ्रीज केलेली रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तींना परत देण्याची व्यवस्था देखील आरबीआय आणि इतर बँकेंसोबत मिळून केली जात आहे, असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं.

कॉल, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेक्स्ट मेसेज अशा माध्यमातून कित्येक जणांना दररोज नोकरीचं आमिष किंवा पैसे कमावण्याचं आमिष दिलं जातं. कित्येकांना गुगल रिव्ह्यू किंवा क्रिप्टोच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी असल्याचे मेसेज येतात. तुम्हालाही एखाद्या नंबरवरुन असे मेसेज वा कॉल येत असतील, तर त्याची माहिती चक्षु पोर्टलवर द्यायची आहे. यानंतर त्या नंबरची आणि मेसेजेसची पूर्ण पडताळणी केली जाईल. त्या नंबरपासून धोका असल्यास, तो नंबर बंद केला जाईल.

तक्रार करण्यासाठी कॅटेगरी

सेक्स्टॉर्शन, सरकारी अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक असल्याचं खोटं सांगणे, फेक कस्टमर केअर हेल्पलाईन

बँक, वीज, गॅस, पॉलिसी इत्यादी गोष्टींबद्दलचे फेक कॉल्स

रोबोटिक किंवा वारंवार येणारे स्पॅम कॉल्स

ऑनलाईन नोकरी, लॉटरी, गिफ्ट, लोन ऑफर यांसाठीचे फेक कॉल्स

संशयास्पद वेबसाईट किंवा लिंक असणारे मेसेज

इतर संशयास्पद कॉल किंवा मेसेज