नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ऑनलाईन गेमिंग ॲपवर चर्चा पार पडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली. यावेळी ऑनलाईन गेमिंग प्रकरणी स्वतंत्र कायदा तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महादेव ॲप हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे. महादेव ॲप ही एक पालक कंपनी आहे. यामध्ये सहभागी लोकांनी अनेक साईट्स चालवल्या आहेत. ऑनलाईन गेमिंग ॲपची नोंदणी परकीय राष्ट्रात केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन गेमिंग ॲपच्या व्यवहारांबद्दल माहिती दिली.”
“महादेव ॲपचे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यासंदर्भातील गुन्हे दाखल झाले. त्यानंतर याबद्दलची कारवाईही सुरु झाली. महादेव ॲपचे मुळ प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातदेखील तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच आता याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मुळ गुन्ह्याची चौकशी ईडी करत आहे.” तसेच दोन महिन्यात हा तपास पुर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. याशिवाय ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.