भारतच चीनला टक्कर देवू शकतो; जर्मनीकडून नरेंद्र मोदींचे कौतूक

नवी दिल्ली : अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत गत काही दिवसांत झालेल्या झटापटीचा मुद्द्यावर भाष्य करताना, जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत बोलताना जर्मनीकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. जगात भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही, जो चीनला टक्कर देऊ शकेल, असेही फिलीप यांनी नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय सीमांच्या नियमांचे कुणीही उल्लंघन करता कामा नये, असा इशाराही जर्मनीने चीनला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याबाबतची सविस्तर स्पष्टीकरण दिले. यावर बोलतांना फिलीप म्हणाले की, याबाबत सविस्तर माहिती आमच्याकडे नाही. मात्र, मीडियात येणार्‍या वृत्तांनुसार पाहिल्यास, हा चिंतेचा विषय आहे.

युरोपीय देशांबाबत बोलायचे झाल्यास रशिया आणि युक्रेन युद्धाचा प्रचंड परिणाम पाहायला मिळत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शरणार्थी असो, किमती असो वा अन्य कोणत्याही गोष्टी असो, सर्व गोष्टींवर प्रभाव आहे. आर्थिक आघाडीवरही याचा परिणाम दिसत आहे. मात्र, विकास, लोकसंख्या आणि इतर बाबींमध्ये भारताशिवाय दुसरा कोणताही देश चीनला टक्कर देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

आताच्या घडीला जर्मनी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अन्य देशांशी जर्मनीला व्यापार वाढवावा लागणार आहे. मात्र, भारताकडून आम्हाला अपेक्षित प्राधान्य मिळताना दिसत नाही, अशी खंत फिलीप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. एटीएफचा करार झाला पाहिजे. कारण यामुळे जर्मनी आणि भारतामधील व्यवसायिक संबंधात अभूतपूर्व बदल दिसू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.