..तरच महाराष्ट्रात पाय ठेवा, बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

मुंबई : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यच वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची शक्यता आज ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले बावनकुळे? 
‘स्वा. सावरकरांचा राहुल गांधी यांनी पाच वेळा अपमान केला. त्यांनी ही भूमिका अद्यापही बदलली नसून त्यांनी माफीही मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही.” उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी.

सावरकरांची ज्याप्रकारे अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदाच नाही तर पाच वेळा जाणीवपूर्वक स्वा. सावरकर यांचं नाव घेऊन टीका केली. सावरकर यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका, असं त्यांना अनेकांनी वारंवार समजावलं. तुमची ती उंची नाही आहे. तरीही त्यांनी अपमान केला. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिला आहे.