यावल । राज्यभरात महावितरणकडून वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई केली जात असून याच दरम्यान यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात महावितरणने वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. ज्यामध्ये काही मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे गावातील ५० वीज मीटर तपाणीसाठी ताब्यात घेतले आहे.
या तपासणीत आढळून आलेल्या संशयीत मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित ग्राहकांना वीज युनिट नुसार दंडाची नोटीस दिली जाणार आहे.
डिजिटल मीटर बसविण्याची योजना
महावितरणकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात पथक पोहचून तपासणी केली असून, लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसवून जुने मीटर काढण्यात येणार आहे. ही मोहीम वीज चोरी रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पावल मानली जात आहे.
ग्रामीण भागात कारवाई
राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.