स्वस्तात घर बांधण्याची संधी : किंमती ४० टक्क्यांनी घसरल्या; वाचा सविस्तर

मुंबई : डोक्यावर हक्काचे घर असावे, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या महागाईमुळे स्वत:चं घर बांधणं तेवढं सोप राहिलेलं नाही. सिमेंट, वाळू आणि लोखंडी सळ्या हे घटक महाग झालेले आहेत. मात्र जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी संधी चालून आली आहे. कारण लोखंड अर्थात सळ्यांच्या किंमती गेल्या काही महिन्यांत जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाल्या आहेत.

देशभरात सळ्यांची किंमत कमी झाली आहे. यामुळे सळ्यांवर होणारा मोठा खर्च आपोआपच कमी होणार आहे. २०२३ च्या अखेरच्या महिन्यात सळ्यांची किंमत देशभरात दोन ते तीन हजारांनी कमी झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला 47,000 रुपये प्रति टन लोखंडी सळ्यांची किंमत सध्या 43,700 ते 44,000 दरम्यान आल्या आहेत.

२०२२ मध्ये लोखंडी सळ्यांची किंमत गगनाला भिडली होती. लोखंडी सळ्या या काळात 78,800 रुपये प्रति टन एवढ्या चढ्या दराने विकल्या जात होत्या. त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जात होता. यामुळे या 93,000 रुपये प्रती टन एवढ्या प्रचंड दराने घ्याव्या लागत होत्या. आताचा दर पाहता यात जवळपास ४० टक्के घट झाली आहे.

नवीन वर्षामध्ये सिझन येत असल्याने लोखंडी सळ्यांसह, सिमेंट, विटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अजून कमी होण्याची वाट पाहत असाल तर नुकसानच होण्याची शक्यता आहे. दर वाढले तर तुमच्या खिशातून जादा पैसे द्यावे लागतील. यामुळे स्वस्तात घर बांधण्याची संधी सोडू नका.