विरोधी पक्षांच्या ऐक्याचा नवा बुडबुडा !

दिल्ली वार्तापत्र 

श्यामकांत जहागीरदार

लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी उरला असताना विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या तथाकथित हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. या मालिकेतील ताजी घडामोड नुकतीच चेन्नईत झाली.तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षनेत्यांच्या या बैठकीचे आयोजन द्रमुकने नाही तर स्टॅलिन यांनीच स्थापन केलेल्या ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्टिज या संघटनेने केले होते. २०२४ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जवळपास २० पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजातील शोषित, पीडित आणि वंचित वर्गाला म्हणजे मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प या बैठकीत सोडण्यात आला. त्यातूनच जातीय जनगणनेची मागणी करण्यात आली. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. कारण, मुळात ही बैठकच आभासी पद्धतीने झाली.२० पक्षांचे नेते या बैठकीत व्हर्च्युअली सहभागी झाले. हे वाचलं का … ‘अतिवृष्टी’ ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

द्रमुक नेते स्टॅलिन यांचीही राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याची आणि राष्ट्रीय नेते होण्याची इच्छा असल्याचे या बैठकीतून दिसून आले. तामिळनाडूच्या राजकारणात अण्णादुराई, करुणानिधी आणि जयललिता यांच्यासारखे प्रभावशाली नेते झाले. या नेत्यांचे राष्ट्रीय राजकारणात महत्त्व नव्हते असे नाही, पण हे सर्व नेते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून कधी ओळखले गेले नाहीत. दक्षिण भारतातील विशेषत: तामिळनाडूचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती. या प्रतिमेच्या बाहेर येण्याचा प्रयत्न स्टॅलिन करीत असल्याचे या बैठकीतून दिसून येत आहे. राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयुचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि आपचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरqवद केजरीवाल करीत होते. त्यात आता स्टॅलिन यांच्या रूपात पाचव्या मुख्यमंत्र्याची भर पडली आहे. स्टॅलिन वगळता अन्य चार नेत्यांनी पंतप्रधान होण्याची आपली इच्छा कधी लपवली नाही. स्टॅलिन यांनी मात्र अशी इच्छा कधी व्यक्त केली नाही. कारण, स्टॅलिन यांचा द्रमुक हा काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूच्या राजकारणात त्याची काँग्रेससोबत आघाडी आहे.

तामिळनाडूत द्रमुकची सत्ता असली आणि स्टॅलिन मुख्यमंत्री असले, तरी या आघाडीत द्रमुककडे दुय्यम भूमिका आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तामिळनाडूच्या बाहेर द्रमुक आणि स्टॅलिन यांची ओळख एक प्रादेशिक पक्ष आणि त्याचे नेते अशीच आहे. राष्ट्रीय राजकारणात करुणानिधी यांचे जेवढे महत्त्व होते, तेवढे महत्त्व स्टॅलिन यांना आतापर्यंत मिळविता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या इशाèयावरूनच स्टॅलिन यांनी विरोधी पक्षनेत्यांची ही बैठक बोलाविल्याची चर्चा आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आप आणि भारत राष्ट्र समिती या तीन पक्षांचे नेते प्रथमच सहभागी झाले. काँग्रेसने विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी आतापर्यंत बोलावलेल्या बैठकीला या तीन पक्षांचे नेते कधी उपस्थित राहिले नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कारण, देशातील कोणताच पक्ष अगदी राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस पक्षही आपल्या बळावर भाजपाला पराभूत करू शकत नाही. १९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपाची ताकद नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०१४ नंतर देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.१९८४ मध्ये दोन जागा जिंकणारा भाजपा त्यानंतर ३० वर्षांत ३०० जागांपर्यंत झेप घेईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

पण ही अशक्यप्राय कामगिरी नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई नेतृत्वाने करून दाखवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागांमध्ये आणखी वाढ झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागांमध्ये विक्रमी वाढ होण्याची खात्री भाजपा नेत्यांनाच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे दावेदार राहुल गांधी यांच्यात झाली तर भाजपा ४०० च्या पुढे गेल्याशिवाय आणि काँग्रेस २५ च्या आत आल्याशिवाय राहणार नाही.भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पुन्हा पडू लागली आहेत. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची चापलुसी करणारे नेते त्यांच्या या स्वप्नांना खतपाणी घालत आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस मोदी यांच्या भाजपाचा पराभव करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जोपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधींकडे आहे, तोवर भाजपाला चिंता करण्याचे कारण नाही. राहुल गांधी काँग्रेस पक्षासाठी गेल्या काही वर्षांत ‘लायबिलिटी’ ठरत असले तरी भाजपासाठी मात्र ‘अ‍ॅसेट’ ठरत आहे. भाजपाचे नेते भाजपाचा जेवढा फायदा करून देत नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा राहुल गांधी भाजपाचा करून देत आहेत.

गेल्या काही वर्षांत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपाचे ११ कोटींवर सदस्य आहेत. चीनमधील कम्युनिस्ट पक्षालाही भाजपाने सदस्य नोंदणीत मागे टाकले आहे. त्यामुळेच कोणताही एकटा पक्ष भाजपाला पराभूत करू शकत नाही. आपण सगळे एकत्र आल्याशिवाय भाजपाला पराभूत करू शकत नाही, याची काँग्रेससह देशातील समस्त विरोधी पक्षांचीही खात्री पटली आहे. देशात जवळपास आठ राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला, तरी भाजपा वगळता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भाकपा, माकपा, बसपा, एनपीपी हे राष्ट्रीय पक्ष आहेत. यात आता आपची भर पडली आहे. देशातील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष एकत्र आले तरी ते भाजपाचा पराभव करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशव्यापी पाया असलेल्या राष्ट्रीय पक्षाचा पराभव करणे तसे कठीणच असते. १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव करण्यासाठी चार पक्षांना एकत्र येत जनता पक्षाची स्थापना करावी लागली होती.

जनसंघ, संघटन काँग्रेस, भारतीय लोकदल आणि सोशालिस्ट पार्टी या पक्षांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली होती. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाच्या ताकदीमुळे काँग्रेसचा पराभव झाला नाही तर आणिबाणीमध्ये सर्वसामान्य जनतेवर जे अनन्वित अत्याचार करण्यात आले, त्यातून लोकांमध्ये जो प्रचंड क्षोभ निर्माण झाला, त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता, ही वस्तुस्थिती आहे. जनता पक्ष सत्तेवर आला असला तरी त्यातील नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे तो फार काळ टिकू शकला नाही. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. आज भाजपाविरुद्ध जवळपास दीड-दोन डझन राजकीय पक्ष एकत्र आले असले, तरी ते भाजपाचा पराभव करू शकणार नाही. कारण, देशातील लोकांचा मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपावर ठाम विश्वास आहे. मोदींच्या नेतृत्वातच भारत सुरक्षित राहील आणि त्याची प्रगती होईल, अशी खात्री आहे. त्यामुळे अशा कितीही आघाड्या तयार झाल्या तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वातील भाजपाचा विजयरथ कोणी रोखू शकत नाही.
९८८१७१७८१७