---Advertisement---
पुणे: बहुचर्चित मराठा आरक्षणाबाबत सरकारने जीआर काढला आहे. याविषयी चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. त्यातूनच समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ते आता गपगार झाले आहेत, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
बहुचर्चित मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानावर काही दिवस उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारने उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आदेश काढण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यासंदर्भातील आदेश काढला. मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयावर हे काय बोलले, ते काय बोलले, अशी प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा सध्या माध्यमांमधून सुरू आहे. यातून विरोधक चुकीची माहिती देत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे हे अभियान सामूहिक प्रयत्नांमधून यशस्वी करा. गावांमध्ये चांगली कामे करा. २०२२ मध्ये खरे तर निवडणुका व्हायला हव्या होत्या. पण काही कारणास्तव निवडणुका लांबल्या. सर्वोच्च न्यायालयात ही प्रकरणे प्रलंबित होती. त्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्याने आता निवडणुका होतील. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून आपले गाव तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर येईल यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.