---Advertisement---

Pune News : पुणे मेट्रोचा विस्तार, ‘या’ मार्गांसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश

---Advertisement---

पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका आणि महामेट्रोला खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कात्रज ते हिंजवडी या मेट्रो मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार महापालिका डीपीआर तयार करून केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला सादर करणार आहे.

खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या प्रस्तावित मार्गामुळे खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा मार्ग निर्माण होईल.

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

खराडी परिसर हा वेगाने विकसित होणारा व्यावसायिक आणि निवासी क्षेत्र असून, येथील वाहतूक सोयीसाठी मल्टीमोड्यूल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा विचार केला जात आहे. हा हब उभारल्यास पुणे विमानतळावर मेट्रोच्या सर्व मार्गांवरून प्रवास करता येईल. त्यामुळे चांदणी चौक, निगडी-स्वारगेट आणि हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळाशी जोडता येईल. याशिवाय खडकवासला-स्वारगेट-हडपसर मार्गावरील प्रवाशांनाही विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोच्या वर्तुळाकार मार्गांची संकल्पना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने कात्रज-चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होईल.

महानगरपालिकेला भुसारी कॉलनीजवळ आणि चांदणी चौक येथे दुमजली उड्डाण पूल उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा यशस्वी प्रयोग झाल्यामुळे वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल उभारण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

भविष्यातील दृष्टीकोन

पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्यातील गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पुणे मेट्रोचा विस्तार वेगाने सुरू आहे. या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा मिळावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रोशी जोडले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment