अवैध गौण खनिजचे वाहन पलटी, चालकाचे पलायन; तलाठी बालंबाल बचावला

एरंडोल : अवैध गौण खनिज वाहतूकीचे वाहन येथील महसूल यंत्रणेच्या पथकाने पकडले असता चालकाने वाहन वेगाने पलटी करून पलायन केले. त्यात ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी सागर कोळी हे बालंबाल बचावले. ही घटना सोमवार, संध्याकाळी मरिमाता मंदिर परिसरात घडली.

सोमवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती येथील तहसील कार्यालयाला प्राप्त झाली. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी ट्रॅक्टर पकडण्यासाठी नायब तहसीलदार दिलीप पाटील, तलाठी सागर कोळी, सदानंद मुंडे, सुरेश कटारे, सुधीर मोरे, ऋषीकेश पोळ,याज्ञीक यांच्या पथकाला शासकीय वाहनाने पाठवले.

एरंडोल शहराजवळ ट्रॅक्टर पकडण्यास महसूल पथकास यश आले असता मरिमाता मंदिराजवळ ट्रॅक्टर मालकाने मागून येऊन वाहनचालकास ट्रॅक्टर पलटी करण्याचे सांगितले.त्याप्रमाणे ट्रॅक्टर पलटी करण्यात आले आणि चालकाने पळ काढला.

या घटनेमध्ये तलाठी सागर कोळी ट्रॅक्टरवर बसलेले असताना त्यांना मुका मार लागला असून पायाला व डोक्याला मुका मार लागला आहे.त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सदर ट्रॅक्टर चालक व ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.