हैदराबाद : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता प्रचाराने वेग घेतला आहे. भाजपाने हैदराबादमधून पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या टी. राजा यांना उमेदवारी दिली आहे. टी. राजा सिंग यांच्या उमेदवारीवरुन असदुद्दीन औवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. टी. राजा हे हैदराबादमधील भाजपाचा हिंदुत्त्ववादी चेहरा असून हिंदूत्ववादी विधानांसाठी ते कायम चर्चेत असतात. यापूर्वी, भाजपाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन केलं होतं. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
भारतीय जनता पक्षाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत एकूण ५२ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत टी.राजा यांचाही समावेश आहे. टी.राजा पुन्हा गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. टी. राजा यांना उमेदवारी दिल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त करत भाजपला लक्ष्य केलं.
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार टी राजा सिंह यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. द्वेष पसरवणारे भाषणं करणाऱ्यांना मोदींच्या भाजपाकडून लवकरात लवकर प्रमोशन दिलं जातं. मोदींनी आपल्या प्रियजनांना प्रमोशन दिलं आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे की, नुपूर शर्मालाही बक्षीस दिलं जाईल, असे ओवैसी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.