Asaduddin Owaisi : ओवेसींची खासदारकी धोक्यात !

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून काल संसदेत शपथ घेतली. त्यांनी शपथविधीदरम्यान ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. त्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणी ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. ओवेसी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट केले की, हरि शंकर जैन यांनी भारतीय संविधानाच्या कलम १०२ आणि १०३ अंतर्गत असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. ओवेसी यांच्या विधानावर भाजपाने आक्षेप घेत म्हटले की, विद्यमान नियमांनुसार त्यांना संसदेतून अपात्र ठरवण्याची कारणे आहेत. कलम १०२ चा हवाला देत भाजपाने म्हटले आहे की ओवेसी यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.

वाद वाढल्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी सभागृहात काहीही चुकीचे बोललो नाही. मी घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. मी म्हणालो- जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन. हे घटनेच्या विरोधात कसे काय असेल? संविधानात अशी तरतूद दाखवा. नेहमी आपलेच खरे म्हणता येणार नाही. दुसरे काय म्हणतात हेही आपण एकदा ऐकून घ्यायला हवे. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो, असेही ते म्हणाले.