पी. चिदंबरम: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर देशभरात बदला घेण्याची आणि मोठ्या लष्करी कारवाईची मागणी वाढू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण युद्धाऐवजी संतुलित आणि धोरणात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले. यात भारतीय सैनिकांनी दहशतवादविरोधी मोठी कारवाई करत दशतवाद्यांचे ९तळे उध्वस्थ करत १००अधिक दहतवाद्यांना कंठस्नान होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी देखील याचे कौतुक केले आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखाद्वारे मोदी सरकारच्या युद्ध धोरणाचे कौतुक केले आहे.
पी चिदंबरम लिहितात-
काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराला “बुद्धिमान आणि संतुलित” असे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सूड घेण्याचे आवाज उठले होते, परंतु सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून मोठे युद्ध टाळले.
ते म्हणाले की, भारताची लष्करी कारवाई मर्यादित आणि सुनियोजित होती, ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे होता. चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शहाणपणाचे पाऊल असल्याचे वर्णन केले आहे, कारण याद्वारे भारताने जागतिक स्थिरतेला प्राधान्य दिले आहे आणि पूर्ण युद्धाची परिस्थिती टाळली आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुशक्ती आहेत आणि पूर्ण युद्ध केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक अस्थिरता निर्माण करू शकते. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-गाझा संघर्षांचे उदाहरण देत ते म्हणाले की, आता जगाला युद्ध परवडणारे नाही.
चिदंबरम यांनी ७ मे रोजी सरकारच्या लष्करी कारवाईचे वर्णन “कायदेशीर आणि लक्ष्याभिमुख” असे केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. भारताने नागरी भागांवर किंवा पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला केला नाही याचे त्यांनी कौतुक केले. चिदंबरम म्हणाले, ‘पाकिस्तानने विमान पाडल्याचे निरर्थक दावे केले परंतु एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री अडखळत राहिले आणि त्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे देऊ शकले नाहीत.’
तथापि, त्यांनी इशारा दिला की लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि द रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचा पूर्णपणे नायनाट झाला आहे असे गृहीत धरणे घाईचे ठरेल. त्यांच्या मते, या संघटनांमध्ये नवीन नेतृत्व म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे आणि आयएसआयचा पाठिंबा अजूनही कायम आहे.
त्यांनी सरकारच्या पारदर्शकतेचे कौतुक केले आणि महिला लष्करी अधिकाऱ्यांना मीडिया ब्रीफिंगमध्ये आणणे ही एक “बुद्धिमतेचे पाऊल” असल्याचे म्हटले. चिदंबरम यांनी पाकिस्तानमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली आणि म्हटले की निर्णय घेण्याचा अधिकार तिथल्या निवडून आलेल्या सरकारला आहे की लष्कर आणि आयएसआयला? त्यांनी लिहिले की भारताने आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात टाकला . आता पाकिस्तानला ठरवायचे आहे की त्यांना युद्ध हवे आहे की अस्थिर शांतता. चिदंबरम यांचा असा विश्वास आहे की येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि सीमेवर तणाव, अधूनमधून गोळीबार आणि अस्थिरता कायम राहू शकते.