Pachora : सर्वत्र अयोध्येतील श्रीराममल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चैतन्यदायी वातावरण असतांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने पाचोरा शहरातून भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण देश राममय झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती मोठ्या आनंदाने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार बनला आहे. याच पावन पर्वाचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम मंदिरापर्यंत भव्य रामरथ शोभायात्रा काढण्यात आली. यात हजारोंच्या संख्येने आबालवृध्द पाचोरेकर सहभागी झाले.
प्रारंभी वैशाली सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शोभायात्रेत प्रारंभ झाला. यात वाजंत्रीचा गजर आणि जोरदार जयघोषाने परिसर अक्षरश: दणाणून निघाला. यातच स्वत: वैशाली सूर्यवंशी यांनी वाजंत्रीच्या तालावर ठेका धरल्याने उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले. ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेचे स्वागत केले. या शोभायात्रेमुळे मार्गावरील वातावरण भगवामय आणि राममय झाल्याचे दिसून आले. या शोभायात्रा मध्ये निर्मल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांचा आणि समस्त शिक्षक वृंद व नॉन टीचिंग सदस्यांचा विशेष सहभाग झाला. याप्रसंगी राम जन्मभूमी चे कारसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, शोभायात्रा श्रीराम मंदिरात आल्यानंतर वैशाली सूर्यवंशी आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची महाआरती करण्यात आली. या दाम्पत्याने मंदिराचे महंत विष्णूदासजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर या भव्य शोभायात्रेची सांगता झाली.
याप्रसंगी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि परिसरातले महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.