तरुण भारत लाईव्ह । जळगाव : पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भीषण अपघात घडलाय. भरधाव पिकअप मालवाहू गाडी चौकात उभा असलेल्या प्रवाशासह दुचाकीवर आदळल्याची घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. भडगावकडून बुलढाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने चौघांना उडवले. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासून निकामे झालेत तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
भडगावच्या दिशेने बुलढाण्याकडे एमएचबीएम ७९४३ ही पिकअप भरधाव वेगाने जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री दत्त मंदिरासमोर काही जण बसले होते. बसलेल्या वसंत भाईदास पाटील (वय ४२) रा. सुरत, विनोद पाटील (वय, ५०) रा. पाचोरा, अमोल वाघ (वय २७) रा. पाचोरा आणि कुंदन परदेशी (वय १७) रा. पुनगाव या चौघांना जोरदार धडक दिली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले असता जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच पिकअपच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.