पाचोरा : येथील रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत धावत्या रेल्वे खाली आल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २८ रोजी घडली. सागर उर्फ विकी राजू जोगळे ( 32, रा. नागसेन नगर, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत ट्रेन नं.१२१३९ डाउन सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडी खाली आल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती सेवाग्राम एक्स्प्रेसचे लोको पायलट यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक यांना कळवली. उप स्टेशन प्रबंधक यांनी घटनेची माहिती पाचोरा दुरक्षेत्र रेल्वे पोलिसांना दिल्याने एएसआय रामराव इंगळे, आरपीएफ सागर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
घटने प्रकरणी आधी मयताची अनोळखी म्हणून नोंद घेण्यात आली मात्र मयताच्या उजव्या हाताच्या दंडावर बुद्धाचे व छातीवर भीम रत्न असे गोंदलेले चित्र आढळून आल्याने या चित्रांवरून मयताची ओळख पटली. मयत हा पाचोरा शहरातील नागसेन नगर भागातील असून त्याचे नाव सागर उर्फ विकी राजू जोगळे (32) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन झाल्यानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा पुढील तपास एएसआय रामराव इंगळे हे करीत आहे.