---Advertisement---

Pachora Crime News : पाटील ज्वेलर्स घरफोडी; चोरीच्या गुन्ह्यांचा पाचोरा पोलिसांकडून छडा, आरोपींकडून मुद्देमाल जप्त

---Advertisement---

पाचोरा । शहरातील पाटील ज्वेलर्समध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात पाचोरा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यातील ६७०८१-०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचे अन्य तीन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील पाटील ज्वेलर्समध्ये दि. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे चॅनल गेट तोडून आत प्रवेश केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर काढून टाकला. दुकानातील तब्बल ६८०००-०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी राहूल विश्वनाथ चव्हाण यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९/२०२५, भादंवि कलम ३०५, ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी वेगवान तपास सुरू केला. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता गुन्हेगार एका पांढऱ्या बोलेरो वाहनातून आले असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या बोलेरो वाहनाची माहिती देण्यात आली. तपासादरम्यान, धरणगाव पोलीस ठाणे हद्दीत एक बोलेरो वाहन चोरीला गेल्याचे समजले. यामुळे दोन्ही गुन्ह्यांचा संबंध असल्याचा संशय बळावला. पुढील तपासात ७ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी रणजितसिंग जुन्नी याला जळगाव येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली बोलेरो (क्र. एमएच-१९ एएक्स-७०९८) जप्त करण्यात आली.

चौकशीदरम्यान, आरोपीने पाचोरा घरफोडीसह खामगाव (बुलढाणा) येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अधिक तपास केल्यावर आरोपीने गुन्ह्यातील माल जळगावमधील एका सोनाराकडे गहाण ठेवला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ जळगाव गाठून सदर सोनाराच्या दुकानातून ६७०८१ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.

अटक आरोपी रणजितसिंग जुन्नी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल १३ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पाचोरा घरफोडीप्रकरणी त्याने आपल्या तीन साथीदारांसह हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. त्याचे सहकारी हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव), सुबेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवद, परभणी), शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा. बोंड, परभणी) फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पाचोरा पोलिसांनी तातडीने तपास करून गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे पोलीस अधीक्षक जळगाव यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहवा राहूल शिंपी, सहा. पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, सागर पाटील, तसेच चापोकॉ मजिदखान पठाण यांनी विशेष भूमिका बजावली.

सध्या अटक आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या मागील गुन्ह्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment