---Advertisement---
पाचोरा : शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटात देखील मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाली आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात मोठे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून जंबो प्रवेश सोहळ्यात असंख्य नागरिक, कार्यकर्ते, गटप्रमुख व गणप्रमुखांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
जंबो प्रवेश सोहळ्यात गाळण, तारखेडा, गट व गण, वरसाडा, पिंपळगाव हरे या गावांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग होता. ग्रामीण परिसरातील तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक, महिला व विविध समाजघटकातील लोकांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर विश्वस व्यक्त करत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले प्रवेश हे या विकासकार्यातील विश्वासाचे द्योतक आहे.
या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, जेष्ठ नेते शालिग्राम मालकर, तालुका प्रमुख विनोद तावडे,यांच्या सह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या नागरिकांनी गावोगाव शिवसेना बळकट करण्याचा संकल्प केला. या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) ला मोठी ताकद प्राप्त झाली असून आगामी स्थानिक जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, निवडणुकीत त्याचा थेट परिणाम दिसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.