मुंबई : मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यात एक्सवॉर रंगल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत’ अशी एक पोस्ट शेअर केली असून, त्याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युवा संघर्ष यात्रेचा उल्लेख करत कोणाचेही नाव न घेता अनाजी पंत म्हणत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. युवासंघर्ष यात्रेत साडेचारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ ने संपवली. आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली. रोहित पवार यांच्या ट्विटचा अर्थ लक्षात घेऊन भाजप समर्थकांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देताना टीका केली आहे.
मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार
गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पडळकर म्हणतात की, तुमच्या माहिती करता रोहित पवार, स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवारच आहेत, या शब्दांत पलटवार केला. या पोस्टसह एक फोटो शेअर केला असून, त्यावर एका व्यक्तीच्या हातात मराठा आरक्षण रद्द, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द, पदोन्नती आरक्षण असा कागद असल्याचे पाहायला मिळत आहे.