Nandurbar Lok Sabha : नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ऍड.के.सी.पाडवी यांचे सुपूत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपाच्या बैठकीत काँग्रेस उमेदवारावर भाष्य करून लक्ष वेधून घेतले.
काय म्हणाले पद्माकर वळवी ?
काँग्रेसचा उमेदवार अगदीच नवखा आहे. त्यांना कुणीही ओळखत नाही. त्या मानाने आपला उमेदवार चांगला असल्याचे ते म्हणाले. आपण भाजपामध्ये कुठल्याही अटी, शर्तीवर आलो नाही किंवा एका दिवसात प्रवेशाचा निर्णय घेतला नाही. वर्षभरापासून आपली चर्चा सुरू होती असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या विविध सेलच्या प्रमुखांची बैठक शनिवार, ३० रोजी नंदुरबारात झाली. पद्माकर वळवी यांचा भाजपाच्या पहिल्याच व्यापक बैठकीत सहभागी होण्याचा प्रसंग होता. त्यामुळे ते काय बोलतात याकडे लक्ष लागून होते. सुरुवातीला त्यांनी आपण कुणावर आरोप करणार नाही किंवा राजकीय भाष्य करणार नसल्याचे सांगितले. परंतु बोलण्याच्या ओघात काँग्रेस उमेदवाराबद्दल बोलून त्यांनी लक्ष वेधून घेतले.