जामनेर: नवी सांगवी पहूर ता. जामनेर येथे कामासाठी आलेल्या बत्तीस वर्षीय अज्ञात तरूणाने पहूर-सांगवी रस्त्यावरील शेतातील विहिरीत गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पहूर पोलिसांनी ओळख पटविणासाठी चक्रे फिरविली बुधवारी पहाटे तरूणाची ओळख पटली आहे. मोंढाळा.ता.पाचोरा येथील अजीत अफजल तडवी(३२) असे मृत तरूणाचे नाव असून पहूर येथील नातेवाईकाचा आतेभाऊ असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजीत अफजल तडवी हा मोंढाळा ता.पाचोरा येथील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने नवी सांगवी येथील रहिवासी अफजल चे आतेभाऊ धरम तडवी यांच्या कडे पाहूणा म्हणून राहण्यास होता. सोमवारी रात्री पहूर- सांगवी रस्त्यावरील विठ्ठल देवचंद भडांगे यांच्या शेतातील विहिरीत अजीत अफजल तडवी याने विद्युत पंपाच्या केबलच्या साहाय्याने गळफास लावून लटकून घेत जिवन यात्रा संपविली.
शेतमजूराला आढळला मृतदेह
शेतमजूर निवृत्ती माळी नेहमी प्रमाणे शेतात रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी गेले. विद्युत पंप चालू करण्यापूर्वी पाणी पातळी पाहण्यासाठी विहिरीत डोकावले असता विहिरीत लटकलेला मृतदेह आढळला. याची माहिती डॉ. सचिन भडांगे यांना दिली. डॉ.भडांगे यांनी पोलिसांना कळविले. घटनास्थळी पो.कर्मचारी विनोद पाटील यांनी पाहणी केली. तरूणाची ओळख पटविणासाठी रात्रीच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे,साहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, गोपाळ माळी, विनोद पाटील, संदीप पाटील यांनी चक्रे फिरविली. बुधवारी पहाटे ओळख निष्पन्न झाली. यापूर्वी अनेक वेळा अजीत तडवी याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे ही सांगण्यात आले आहे. भाऊ मंजीत तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. तपास पोलीस कर्मचारी भरत लिंगायत करीत आहेत.