Pakistan : इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा २०२४ साली निवडणूक लढण्यासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळला आहे.
71 वर्षीय माजी क्रिकेटर इम्रान खान सध्या राजकीय आणि कायदेशीर लढाईमध्ये अडकले आहेत. त्यांना २०२२ मध्ये पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. २०१८ ते २०२२ या कार्यकाळात राज्याचे गिफ्ट विकल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत.
इम्रान खान हे पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना निवडणूक लढता येणार नाही. असे असले तरी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलं की, ते मतदारसंघाचे रसिस्टर्ड मतदार नाहीत आणि त्यांना कोर्टाने अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज आम्ही फेटाळत आहोत.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा मतदारसंघ मिनावली येथूनही निवडणूक लढण्याचा अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, इम्रान खान यांची लोकप्रियता पाकिस्तानमध्ये अद्यापही कामय आहे. इम्रान यांनी आरोप केलाय की, लष्कर मला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कराने हा आटोप फेटाळला आहे.