नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यासोबतच तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकीवर गोळ्यांनी हल्ला करण्यात आला. या परिसरात अनेक स्फोट झाले. प्रतिबंधित बलूचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) माजिद ब्रिगेडने तुर्बत नौदल एअरबेसवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
द बलुचिस्तान पोस्टनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे लढाऊ सैनिक एअरबेसमध्ये घुसले आहेत. तुर्बतमधील हा हल्ला बीएलए माजिद ब्रिगेडचा आठवड्यातील दुसरा आणि या वर्षातील तिसरा हल्ला आहे. यापूर्वी २९ जानेवारीला त्यांनी ग्वादरमधील लष्करी गुप्तचर मुख्यालय माच शहराला लक्ष्य केले. मग २० मार्चला तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर हल्ला केला, असे द बलुचिस्तान पोस्टने वृत्त दिले आहे.
बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान त्या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मनमानी पद्धतीने वापर करतात असाही माजीद ब्रिगेडचा आरोप आहे. ग्वादर बंदर चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या दृष्टीने महत्त्वाच आहे. या बंदरावर चीनच नियंत्रण आहे. अब्जो डॉलर खर्च करुन रस्ते आणि ऊर्जा प्रकल्प सुरु आहेत. हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिवचा (बीआरआय) भाग आहे.