तरुण भारत लाईव्ह । २५ फेब्रुवारी २०२३। आपला सख्खा शेजारी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या या दुर्दशेला अन्य कोणताही देश नाही, तर तो स्वत:च कारणीभूत आहे. आपल्या कर्माने पाकिस्तानने आपले वाटोळे करून घेतले आहे. कोणत्याही क्षणी तो देश आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या हातात आज ख-या अर्थाने भिकेचा वाडगा आला. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक देशांकडे भीक मागण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. नाणेनिधीने कर्ज देताना काही अटी पाकिस्तानवर घातल्या आहेत. यातील सर्वात पहिली अट म्हणजे सरकारी खर्चात कपात करण्याची आहे.
पाकिस्तानला नाईलाजाने ही अट मान्य करावी लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि अन्य मंत्री पगार घेणार नाही, आपल्या बंगल्यातील वीज, पाणी, गॅस, दूरध्वनी यांची देयके भरतील, असा निर्णय तेथील सरकारला घ्यावा लागला आहे. आलिशान सरकारी गाड्या विकण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्र्यांच्या अनावश्यक विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्र्यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असून परदेशात पंचतारांकित हॉटेलात यापुढे त्यांना राहता येणार नाही. सरकारी बैठकीत यापुढे फक्त चहा आणि बिस्किटेच मिळणार आहे. यावरून पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती दयनीय झाली असेल, याची कल्पना करता येऊ शकते. अनेक अरब देशांसमोर तसेच चीनसमोर पाकिस्तानला हात पसरावे लागत आहेत. पाकिस्तानातील परकीय चलनाची गंगाजळी संपण्याच्या मार्गावर आली आहे. डॉलर आणि पाकिस्तानी रुपया यांच्यातील तफावत प्रचंड वाढली आहे. यामुळे पाकिस्तानजवळ पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी पैसे उरले नाहीत. इंधनाअभावी देशातील वीजनिर्मिती केंद्र चालविणेही पाकिस्तानला कठीण झाले आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागात रात्री ब्लॅकआऊटची वेळ आली आहे. महागाईचा आगडोंब त्या देशात उसळला आहे. याचा फटका सर्वसामान्य तसेच गरीब जनतेला बसत आहे.
दूध, अंडी, कणीक, भाज्या आणि धान्य किराणा यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. लोकांना औषध मिळत नाही. पाकिस्तानच्या या दुर्दशेला पाकिस्तान सरकार आणि लष्कर जबाबदार आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. पाकिस्तान तीन ‘ए’च्या म्हणजे अल्ला, आर्मी आणि अमेरिका यांच्या भरवशावर चालतो, असे म्हटले जात होते. पाकिस्तानच्या सद्य:स्थितीला अमेरिका जबाबदार नसली, तरी अल्ला आणि आर्मी निश्चितपणे जबाबदार आहेत. विज्ञानाचा, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यापेक्षा पाकिस्तानने धर्माचा मार्ग पत्करला आहे. पाकिस्तानात कायद्याचे नाही तर शरीयतचे राज्य आहे. पाकिस्तानचे वाटोळे करण्यात तेथील सरकार आणि लष्कराची सर्वात मोठी भूमिका आहे. सरकार आणि लष्कराच्या भ्रष्टाचारातून पाकिस्तानवर ही वेळ आली आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत पैसे नसले तर तेथील सर्वपक्षीय राजकारणी, आजी-माजी लष्करी अधिकारी तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिका-यांच्या तिजो-यात प्रचंड धन दडले आहे. हे काळे धन बाहेर काढण्याची हिंमत विद्यमान राज्यकर्त्यांनी दाखविली तरी पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडू शकतो; त्याच्यावर कोणत्याही देशाकडून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही, पण हे कधीच होणार नाही. कारण या भ्रष्टाचारात पाकिस्तानी राज्यकर्ते तसेच लष्करी आणि गुप्तचर अधिका-यांची हातमिळवणी आहे.
पाकिस्तानात वरवर लोकनिर्वाचित सरकार दिसत असले, तरी तेथील सरकार हे नेहमीच लष्कराच्या हातचे बाहुले असते. पाकिस्तान हा जगातील एकमेव असा देश असावा जेथील लष्कर सरकारच्या नियंत्रणात नाही तर सरकार लष्कराच्या नियंत्रणात चालते. यामुळे पाकिस्तानवर आज ही वेळ आली आहे. पाकिस्तान हा तसा आपल्या देशाचाच पूर्वाश्रमीचा भाग. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या आपल्या भूमिकेतून देशातील हिंदू आणि मुस्लिमांत फूट पाडली. या फुटीची परिणती फाळणीत आणि पाकिस्तानच्या निर्मितीत झाली, हा इतिहास आहे. भारताच्या फाळणीला तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांची बोटचेपी भूमिकाही जबाबदार आहे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या मागणीवरून स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर महात्मा गांधी यांच्या हटवादी भूमिकेने भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले होते. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या भारतविरोधी मानसिकतेने पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान झाले. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करानेही भारतविरोधी मानसिकतेला आपल्या स्वार्थासाठी नेहमीच खतपाणी घातले. भारताकडे नेहमीच आपला शत्रू क्रमांक एक म्हणून पाहिले. तसं पाहिले तर भारताने कधीच पाकिस्तानकडे आपला शत्रू म्हणून पाहिले नाही.
पाकिस्तानने लादलेल्या दोन युद्धानंतर भारतातही पाकिस्तानकडे शत्रू म्हणून पाहिले जाऊ लागले. प्रत्यक्ष युद्धात आपण भारताचा पराभव करू शकत नाही, याची खात्री पटल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय यात आघाडीवर होती. भारतात गेल्या काही वर्षांत जेवढ्या दहशतवादी कारवाया झाल्या, त्यात आयएसआयची भूमिका लपून राहिलेली नाही. भारतीय संसदेवरील हल्ला असो की मुंबईसह देशाच्या अनेक भागांत झालेले बॉम्बस्फोट; यात पाकिस्तानचा सहभाग होताच. पाकिस्तानचा डोळा हा नेहमीच भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणा-या काश्मीरवर राहिला, काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले. अनेक दहशतवादी कारवायांची पाठराखण करण्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानने भारताचे केले त्यापेक्षा जास्त नुकसान आपले स्वत:चे करून घेतले. भारतासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाकिस्तानच आता पडला आहे. तरीही पाकिस्तानला शहाणपणा येत नाही, याचे आश्चर्य वाटते. भारताचे नुकसान करण्यासाठी जेवढी ताकद पाकिस्तानने लावली, तेवढीच आपल्याच देशाच्या प्रगती आणि विकासासाठी लावली असती, तर आज पाकिस्तानवर ही वेळ आली नसती. यातून पाकिस्तानची प्रतिमा जगात दहशतवादाची पाठराखण करणारा, त्याला प्रोत्साहन देणारा देश अशी तयार झाली. या प्रतिमेने पाकिस्तानचे अपरिमित नुकसान झाले.
जैश-ए-मोहम्मदसारख्या अनेक दहशतवादी संघटनांचा पाकिस्तान हा जन्मदाता आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. पाकिस्तानवर जगाने अनेक वेळा आर्थिक निर्बंध लादले, त्याला काळ्या यादीत घातले. पण पाकिस्तानला काही शहाणपण आले नाही. कारण पाकिस्तान भारतद्वेषाने आंधळा झाला होता. पाकिस्तानच्या एवढ्या घातपाती कारवायांनंतरही भारताने सर्व क्षेत्रात जी प्रगती केली, ती कौतुकास्पद अशी आहे. कोणत्याच क्षेत्रात पाकिस्तान भारताच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना भारताची वाटचाल ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे, झेप घेतली आहे. विश्वगुरू होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानसमोर मैत्रीचा, सहकार्याचा हात पुढे केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी यात पुढाकार घेतला होता. पंतप्रधान मोदी यांनीही पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.
पण भारताच्या द्वेषात आंधळे झालेल्या पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताचा मैत्रीचा हात आणि प्रस्ताव झिडकारून लावला. याची किंमत भारताला नाही तर पाकिस्तानलाच चुकवावी लागली. त्याची परिणती पाकिस्तानच्या आर्थिक दिवाळखोरीत झाली आहे. यातूनही पाकिस्तानला शहाणपण येईल, आपली भारतद्वेषाची भूमिका तो सोडेल, असे वाटत नाही. पाकिस्तानची वाटचाल जेवढी रसातळाकडे होत राहील, तेवढी त्याची भारताचा द्वेष करणारी मानसिकता उसळून येत राहील. आपल्या या स्थितीला भारतच जबाबदार आहे, असा समज करून घेत तो भारतातील घातपाती आणि दहशतवादी कारवायांना गती दिल्याशिवाय राहणार नाही. ‘हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे’ अशी पाकिस्तानची भूमिका राहू शकते. यामुळे अशा संकटाच्या वेळी भारताने अधिक सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.