Operation Sindoor : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, भयानक युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, युद्धापूर्वीच पाकिस्तान दिवाळखोर होईल, असे सांगितले जात आहे.
कारण पाकिस्तानला केवळ सतर्क राहण्यासाठी आणि आपल्या सैन्याची ताकद दाखवण्यासाठी दररोज अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पाकिस्तान एकापाठोपाठ आर्थिक धक्क्यांचा सामना करत असताना, दुसरीकडे चीन आणि इतर देशांनीही पाकिस्तानपासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जर युद्ध झाले तर पाकिस्तान ते सहन करू शकेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. याचा पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर स्पष्ट परिणाम होईल. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर हल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान युद्धापूर्वीच दिवाळखोर होईल, असे सांगितले जात आहे. एकूणच पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच कठोर कारवाई करून भारताने युद्धापूर्वी पाकिस्तानला दिवाळखोर बनवण्याची रणनीती अवलंबली आहे.
पाकिस्तान दररोज ४ अब्ज रुपये खर्च करतोय
पाकिस्तान सतर्क राहण्यासाठी दररोज ४ अब्ज रुपये खर्च करत आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानला सध्या सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी, विमानांसाठी इंधन देण्यासाठी आणि सीमेवर वस्तू पाठवण्यासाठी सुमारे १.३ कोटी डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.