Asia Cup 2025 : भारत-पाक तणावाचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावरही दिसून येत आहे. बीसीसीआयने आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अर्थात बीसीसीआयने सध्या तरी या बहु-राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे म्हटले जात आहे. याबाबत त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जर भारताने खरच या स्पर्धेतून माघार घेतली तर पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
आशिया कप २०२५ सप्टेंबरमध्ये खेळवला जाईल. यावेळी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. दरम्यान, महिला उदयोन्मुख संघ आशिया कप पुढील महिन्यात श्रीलंकेत होणार आहे. बीसीसीआय लवकरच या स्पर्धांबाबत मोठा निर्णय घेणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी बीसीसीआय एसीसी स्पर्धांबाबत महत्त्वाचे निर्णय घेईल, असे सांगितले.
भारत-पाकिस्तान सामने हे क्रिकेट जगतात सर्वाधिक पाहिले जाणारे सामने आहेत. अशा परिस्थितीत जर बीसीसीआयने आपले नाव मागे घेतले तर त्याचा थेट परिणाम पीसीबीच्या उत्पन्नावर होईल. भारताच्या या निर्णयामुळे पीसीबीला १६५ ते २२० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. भारताशिवाय, स्पर्धेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
दरम्यान, २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. खरंतर, भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता. यानंतर, टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले गेले. त्याच वेळी, भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, पाकिस्तानने अंतिम सामन्याचे यजमानपदही गमावले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताच्या या निर्णयामुळे पीसीबीला सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर पडल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठे आर्थिक संकट येऊ शकते. केवळ पाकिस्तानच नाही तर इतर संघांच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल.