नवी दिल्ली : पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दाबला गेला आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. दूध, गहू, पेट्रोल-डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला आहे. पाकिस्तानला कर्ज देण्यासही कोणता देश तयार नाही. अशी परिस्थीती असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे डेप्युटी हाय कमिशनर सुरेश कुमार देखील उपस्थित होते. दशकांपासूनचे वितुष्ट विसरून भारत पाकिस्तानची मदत करू शकेल का, यावर चर्चा करण्यात आली. म्हणूनच तिटकारा असला तरी भारताला या बैठकीत बोलविण्यात आले होते.
२०१९ पासून दोन्ही देशांमधील व्यापार, संपर्क बंद आहे. दोन्ही देश एकाच वेळी जन्माला आले. पण त्या त्या देशाने आपले भविष्य लिहिले. पाकिस्तानने दहशतवादी पोसले, भारताला युद्धात ढकलले. पण भारताने या सर्वांला सामोरे जात विकासाचे व्हिजन ठेऊन सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचे उदाहरण आता पाकिस्तानला तज्ञ लोक देऊ लागले आहेत. आता अमेरिका, चीन नाही तर भारतच पाकिस्तानला मदत करू शकतो, असेही सल्ले मिळू लागले आहे. पाकिस्तानचे सर्व रस्ते बंद झाल्यावर आता त्यांना भारताची आठवण येऊ लागली आहे.
भारताला पाकिस्तानशी नेहमीच चांगले संबंध हवे आहेत कारण भूगोल बदलता येत नाही, असे कुमार त्या बैठकीत म्हणाले होते. भारत नेहमीच मध्य आशियातील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि पाकिस्तान यामध्ये सहकार्य करू शकतो, असे कुमार म्हणाले आहेत. भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हे संबंध बिघडवण्यात लष्करानेही सक्रिय भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. पाकिस्तानात निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावरच भारतासोबतच्या नव्या व्यापार धोरणाचा निर्णय घेतला जाऊ शकणार आहे.