---Advertisement---
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला कोणी घडवून आणला, याची माहिती आता समोर आली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांनी मिळून हा हल्ला घडवला. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून रचण्यात आला आणि दुसरे तिसरे कोणी नसून केवळ पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच तो घडवून आणल्याचा दावा सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी केला आहे.
सुरक्षा सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखाच लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयचा संयुक्त कट होता. आयएसआयने पाकिस्तान स्थित तोयबाचा कमांडर साजिद जट्टला पहलगामच्या बैसरनमधील हल्ल्यासाठी केवळ विदेशी दहशतवाद्यांना तैनात करण्याचे विशिष्ट निर्देश दिले होते.
या हल्ल्याच्या कट उघड होऊ नये म्हणून कोणत्याही काश्मिरी दहशतवाद्याला या कटात सहभागी करून घेतले नाही. त्याऐवजी, जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत तोयबाच्या विदेशी दहशतवाद्यांना हे हत्याकांड घडवून आणण्यास सांगण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.