कंगाल पाकिस्तानचे तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान

नवी दिल्ली : सर्व बाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानचे रेल्वे खातेही आता कंगाल होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गेल्या सहा महिन्यांत त्यांचे तब्बल २४ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान रेल्वेच्या कमाईत ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, त्यामुळे कर्मचारी वर्गाचे पगारही थकल्याची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या मते, बलुचिस्तानच्या एका मंत्र्याने पाकिस्तान रेल्वेचे २४ अब्ज नुकसान झाल्याचे सांगितले आहे, तरीही पाकिस्तान सरकार हा तोटा केवळ ३ अब्जांपर्यंतच असल्याचे सांगत आहे. पाकिस्तानचे कायदा आणि राज्यमंत्री शहादत अवान यांनी सांगितले की, जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत रेल्वेचे सुमारे ३ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.

आर्थिक संकटांचा सामना करत असलेला पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक मदतीची वाट पाहत आहे आणि पाकिस्तान बेलआउट पॅकेज अंतर्गत खचऋ कडून कर्ज मिळविण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पाक सरकारला आशा आहे की यावेळी खचऋ कडून महत्त्वपूर्ण निधी अनलॉक करण्यासाठी ६.५ अब्ज कर्ज कार्यक्रमाच्या अटींवर लवकरच खचऋ मिशनशी करार होईल.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने अहवाल दिला आहे की, ३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात पाकिस्तानचा केंद्रीय बँकेकडे असलेली परकीय चलन साठा ५.५ टक्के किंवा १७० दशलक्ष डॉलरने कमी होऊन २.९१ अब्ज झाला आहे. यानंतर संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. द न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे एकूण ८.५४ अब्ज डॉलर्सचा साठा आहे, ज्यामध्ये व्यावसायिक बँकांमधील ५.६२ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे.