तरुण भारत लाईव्ह । १३ एप्रिल २०२३। पालक लोहयुक्त असतो आणि त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण लहान मुलांना पालक फारसा आवडत नाही. तर त्यासाठी ‘पालक चाट’ ही अशी पाककृती आहे जी मुलांना आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा करण्याचा आग्रह सुद्धा करतील. तर पालक चाट घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पालकाची दहा पानं, एक वाटी बेसन, चवीपुरतं मीठ, एक चमचा मिरपूड, अर्धा चमचा ओवा, अर्धी वाटी गोड दही, चिंचेचा सॉस, हिरवी पुदीना चटणी, शेव.
कृती
पालकाची ताजी पानं स्वच्छ धुऊन घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर पाणी घ्या आणि त्यात आवश्यकतेनुसार बेसन घालून त्याचे सरसरीत मिश्रण तयार करून घ्या. चवीसाठी त्यात थोडं मीठ, मिरपूड घाला. वरून थोडासा ओवा घातला तरी चालतो. पालकाची धुऊन वाळवलेली पानं या पिठाच्या मिश्रणामध्ये बुडवून चांगली तळून घ्या.तळलेल्या पालक पानांवर वरून गोड दही, चिंचेचा सॉस आणि पुदीना चटणी पसरवा. सजावटीसाठी वरून कुरकुरीत शेव घाला आणि चटपटीत पालक चाट लगेच सर्व्ह करा.