तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : दर वर्षी पंढरपुरात माघी यात्रा भरते यंदा माघ शुद्ध जया एकादशी 1 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यात्त्रेचा कालावधी 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी असा होता. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे भरभरुन दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे. यात्रेच्या काळात वसंतपंचमीच्या दिवशी एका भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर जवळपास पावणेदोन कोटी रुपयाचे सोन्या चांदीचे दान दिल्याने या उत्पन्नात फार मोठी वाढ झाली असून दरम्यान यंदाच्या वर्षी माघी यात्रे साठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते, सुमारे पाच लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पाच लाख वारकरी पंढरपुरात
यंदाच्या कार्तिकी यात्रेहून अधिक विक्रमी माघी यात्रा झाल्याचे दिसून आले. एकादशीच्या दिवशी सुमारे पाच लाख वारकरी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. तर यात्रा काळात सुमारे 8 लाखांहून अधिक वारकरी पंढरीत येऊन गेले आहेत. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न हि भरघोस वाढले आहे. मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे.
यंदा खजिन्यात चौपट वाढ
विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल 1 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आले आहेत. 6 लाख 71 हजार रुपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत. आजवर मंदिर समितीला सोन्या-चांदीचे एवढे किमती दागिने देणगी स्वरुपात मिळाले नव्हते. त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने आल्याने मंदिर समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथून एकूण 19 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर 32 लाख रुपये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पायावर देणगी जमा झालेली आहे. मंदिर समितीच्या हुंडी पेटीतून गत वर्षीच्या तुलनेत दुप्प्पट म्हणजे 78 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाईन स्वरुपात 12 लाख 41 हजार रुपये देणगी जमा झाली आहे. एकुणचं यंदाच्या खजिन्यात चौपट वाढ झाल्याचे दिसून आले.आले.