भुसावळकरांमध्ये घबराट: वेळेपूर्वीच सुटल्या शाळा

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। भुसावळकरांनी यापूर्वीही भूकंपाचे हादरे अनुभवले असले तरी शुक्रवारच्या भूकंपाने मात्र भुसावळकरांची भरदिवसाही झोप उडवली. विशेष म्हणजे शुक्रवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्यानेच दुपारनंतर आणखीन भूकंपाचे धक्के बसतील, ही अनामिक भीती भुसावळकरांच्या मनात असल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जनजीवनावरही परिणाम दिसून आला. सकाळ सत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भूकंपाचे हादरे बसताच शाळा सोडण्यात आल्या तर अन्य शाळांनी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात बसण्याच्या सूचना केल्या तर दुपार सत्रात बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

दुपारनंतर शाळांमध्ये शुकशुकाट
शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल, के.नारखेडे विद्यालय यासह अन्य शाळांमध्ये शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता वर्गात शिक्षक शिकवत असतानाच जमिनीला व इमारतीला 3 ते 5 सेकंदापर्यंत हादरे बसताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. शिक्षकांनी भूकंपाची स्थिती लक्षात घेता तातडीने वर्गांमध्ये सूचना देवून विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानावर बसण्याच्या सूचना केल्या. तसेच ताप्ती स्कूलमध्ये पालकांसह रिक्षाचालक व स्कूल बसचालकांना माहिती देण्यात आल्यानंतर पाल्यांना नेण्याचे आवाहन करण्यात आले, तर के. नारखेडेतही विद्यार्थ्यांची सुटी करण्यात आली, मात्र दुपारनंतर शाळा असूनही विद्यार्थी फिरकलेच नाहीत. भुसावळ तालुक्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या जि. प.च्या 65 शाळा असून ग्रामीण भागात सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते.

इमारत हादरली अन् बाहेर पडलो
-सरकारी वकील नितीन खरे
29 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत आलेल्या भूकंपानंतर भुसावळात त्या काळी काही ठिकाणी घरांना तडे गेले होते. मात्र शुक्रवारी भुसावळला बसलेल्या भूकंपाचे हादरे वेगळे होते व त्याची आजची तीव्रता जास्त असून त्याचा आज अनुभव घेतला आहे. सकाळी 10.35 वाजता इमारत हादरताच घराबाहेर पडलो, असे सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे म्हणाले.

अनेक ठिकाणी पडले भांडे
भुसावळातील कस्तुरीनगर, आनंद नगर, बिलली कॉलनीत नागरीकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले तर कंडारी, राहुल नगर भागातील घरांमध्ये रॅकमधील भांडे खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे तीन ते पाच सेकंदांपर्यंत नागरीकांनी हे धक्के अनुभवले तर भीतीपोटी अनेकांचा थरकाप उडाल्यानंतर उंच बिल्डींगमधूनही नागरीकांनी मोकळ्या जागी अप्रिय घटना टळण्यासाठी धाव घेतल्याचे दिसून आले.