नंदुरबार : रिक्षा आणि मोटरसायकलच्या धडकेनंतर समाजकंटकांनी पसरवलेल्या अफवांमुळे शहरात दगडफेकीसारखा गंभीर प्रकार घडला. काल रविवारी (दि. 19) दुपारी अपघातानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास शहरातील संवेदनशील भागात तणाव निर्माण झाला. जमावाने दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि शहरात शांतता प्रस्थापित केली.
वेळीच पोलीस हस्तक्षेपाने अनुचित प्रकार टळला
त्रिकोणी बिल्डिंग परिसरात झालेल्या या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. पोलिसांनी तातडीने दगडफेक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
13 संशयित ताब्यात, 6 जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणात 13 जणांना ताब्यात घेतले. चौकशीअंती अल्पवयीन 7 जणांना सोडण्यात आले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे शोध पथक पुढील तपास करत असून दगडफेकीतील मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि शांततेत सहकार्य करा,” असे त्यांनी सांगितले. शहरात आता सर्वत्र शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
संपूर्ण शहरात पोलिसांचा बंदोबस्त कायम
घटनास्थळासह शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला चाप बसवण्यासाठी पोलिसांनी सतर्कता दाखवत परिस्थिती हाताळली आहे.
वातावरण निवळले, परंतु सतर्कता कायम
दगडफेकीमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी, पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी अफवांपासून दूर राहून शांततेत सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.