पाणीपुरी ५६ विषबाधितांवर अद्याप उपचार सुरूच; आमदार लता सोनवणे यांची भेट

अडावद ता.चोपडा : आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव आणि परिसरातील ५६ विषबाधितांवर अद्याप उपचार घेत आहेत. तीन दिवस उलटूनही अत्यवस्थ असलेल्या या रुग्णांच्या प्रकृतीवरुन या घटनेचे गांभीर्य जाणवते. आरोग्य विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करित असल्यावरही अद्याप एवढ्या मोठ्या संख्येने बाधित रुग्ण उपचार घेत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला आला आहे.

चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी आज  २० रोजी सायंकाळी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून येथे उपचार घेत असलेल्या १९ रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आरोग्य विभागाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. सरपंच बबनखा तडवी, ग्रामविकास अधिकारी पी.डी.सैंदाणे, सचिन महाजन, हरिष पाटील, संजय पाटील, विजीता पाटील, रियाजअली सैय्यद, नंदू पाटील, लोकेश काबरा, जावेदखा पठाण यांचेसह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर, डॉ.अर्चना पाटील, डॉ.कोमल गावंडे, वाय.आर.पाटील आदी उपस्थित होते.

तसेच चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले २२ रुग्ण व जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ रुग्णांचीही प्रकृती आज रोजी ठिक असल्याचे चोपड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी सांगितले. तर चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांची प्रकृतीही स्थिर असल्याचे डॉ. लोकेंद्र महाजन यांनी सांगितले.