मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष (बीआरएस) विविध राज्यांत तो पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून अनेक आजी-माजी नेते बीआरएसच्या वाटेवर निघाले आहेत. आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मुनगंटीवार म्हणाले की, बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. हैदराबाद महापालिकेत भाजप ३ वरून ५० पर्यंत मजल मारू शकला. राष्ट्रभक्त-देशभक्त मतदार तुष्टीकरणाची नीती चालू देणार नाही. बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे. पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांनी हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले आहे. देश असो वा राज्य उद्धव ठाकरे यांची अवस्था दारुण झाली आहे, अशी बोचरी टीका करत, विरोधकांची पाटणा येथील एकजुटीची बैठक म्हणजे कुठलाही विचार नसलेली गोष्ट आहे. ही बैठक म्हणजे इंजिन विना गाडी आणि आत्म्या विना शरीर असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.