नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, बोरद परिसरात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला २५ रुपये दराने घेण्यात येणारी पपई अवघ्या चार रुपये दरावर येऊन गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे लागलेला खर्च काढायचा कसा, हा प्रश्न त्यांना सतावत असून, पपईला योग्य भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
पपई लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. त्यातच ढगाळ हवामानामुळे फवारणीसाठी लागलेला खर्च तसेच वेगवान वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान यातून सावरत शेतकरी पपई काढण्यास सज्ज झालेला असतानाच पपईचे दर २५ रुपयावरून चार रुपयांवर घसरल्याने शेतकऱ्यांना लागलेला खर्च काढावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून, शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ठोस निर्णय घेऊन योग्य भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
पाच एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव यातून उत्तमरित्या पपईची निगा राखली. फळधारणाही चांगली झाली होती. परंतु पीक काढणीवेळी भाव घसरल्याने आता आर्थिक गणित बिघडले असून योग्य भाव मिळावा. – सुरतान पावरा, पपई उत्पादक