पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवास्थानी आज भारतीय पॅरा खेळाडूंची भेट घेत संवाद साधला. यावेळी मोदींनी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांच्याकडून काही भेटवस्तू स्वीकारल्या. दरम्यान, त्यांनी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवदीप सिंगसाठी असे काही केले, जे आता व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदीजी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले “पॅरालिम्पिकधील यश हे विशेष आणि ऐतिहासिक आहे. आमच्या अतुलनीय पॅरा-खेळाडूंनी २९ पदके जिंकल्याचा देशाला खूप आनंद झाला आहे.
जी भारताची पॅरालिम्पिकमधील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे यश आमच्या खेळाडूंच्या बहूमुल्य समर्पण आणि लढाऊ स्वभावामुळे मिळाले आहे. त्यांच्या खेळातील कामगिरीने आम्हाला लक्षात ठेवण्याचे अनेक क्षण दिले आहेत आणि अनेक आगामी खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.”
पीएम मोदी आणि नवदीप सिंह यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमी उंचीच्या नवदीप सिंगने F41 प्रकारात सुवर्णपदक जिंकले असून त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी टोपी आणली होती.
पंतप्रधान मोदींनी ही टोपी घालावी, अशी त्यांची इच्छा होती. पीएम मोदी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जमिनीवर बसले आणि मग नवदीपने त्यांना टोपी घालायला लावली.
याशिवाय पीएम मोदींनी नवदीप सिंह यांना त्यांचा ऑटोग्राफही दिला. आता पीएम मोदी आणि नवदीप सिंग यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.